Saturday, June 9, 2018

हरिहर गड - वास्तुस्थापत्याचे सौंदर्य

     नाशिक !!! किल्यांचा प्रदेश ...  नाशिक जिल्यात एवढे किल्ले तर नक्कीच आहेत कि आपण संपूर्ण किल्ले फिरायचे म्हंटले तर दर वीकएंड ला एक ट्रेक केला  तरी एक महिना आपणाला पुरणात नाही आणि नाशिक जिल्ह्यतील सर्वच किल्ले म्हणजे बुलंद , अवघड या श्रेणी मध्ये मोडणारे, किल्ला सर करायचं म्हंटल कि २ ते ३ तासांची तांगडतोड करावी लागणारच . बरेच दिवस ऑफिस आणि PC च्या जगात घालवल्यावर आता ओढ होती सह्यद्रीची बऱ्याच दिवसापासून हरिहर या किल्यावर जाण्याची इच्छा होती काही कारणास्तव जाणे होत नव्हतं .शेवटी योग  आला ऑफिस वरून शिफ्ट नंतर बॅगा भरून रात्री ११.५० ची कसाऱ्याला जाणारी लोकल पकडली आणि मोहिमेची सुरवात झाली , यावेळी बरेच रोजचे साथीदार नव्हते.  लहू ,तन्मय आणि मी रोजचे आणि विजय , सचिन , हॅरी आणि आशिष हे नवीन चार जण मिळून आम्ही ७ जण होतो . कसाऱ्याला १.५० चा दरम्यान पोहचलो कसाऱ्या वरून मी आधीच हरिहर ला जाणयासाठी  गाडी बुक केली होती .


सकाळच्या मंद प्रकाशात दिसणारा हरिहरगड
रात्री २ वाजता हरिहर गडाच्या पायथ्यला असलेल्या निरगुनपाडाया   गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला .५० किलोमीटरचा हा प्रवास होता . मध्ये एका हॉटेल मध्ये थांबून एक फक्कड चहा झाला आणि पुन्हा प्रवास चालू झाला .  निरगुनपाडा गावाच्या जवळ जवळ पोहचलो आणि रांगडा गड रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात दिसू लागला. गावात बरीच ट्रेकर मंडळी आली होती. 

 गावात पोहचल्यावर गावात जेवणाची आणि नाश्त्याची सोय करायची होती .  गावात पोहचून गाडीवाल्या ओळखीच्या एका दादांना जेवणाची आणि नाश्त्याची सोय केली आणि मग सर्वचजण रस्त्यावरच बसून गप्पा मारू लागले , मोकळ्या आभाळाकडे बघत चांदण्या न्हाहळत  गप्पा मारण्याचा अनुभव काही औरच होता. गप्पा मारत मारत सकाळचे ५ कधी वाजले समजलंच नाही . गावातल्या दादांकडे पोहे आणि चहा चा नाश्ता करून आम्ही किल्याचा दिशेने प्रवास सुरु केला . 

किल्याचा उजवीकडे चालत राहा असा सांगणारा दिशादर्शक 
डांबरी रस्ता  ओलांडून शेताच्या मळ्यातून रस्ता किल्याकडे जातो .साधारण हा दोन ते तीन तासाचा सोपी श्रेणीचा ट्रेक आहे पण , ८० डिग्री असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या मुळे हा गड मध्यम  श्रेणी मध्ये मोडतो. प्रवास सुरु झाला आणि किल्याचा डाव्या बाजूला जायला आम्ही सुरवात केली पण  , गावातले एक आजोबा भेटले आणि त्यानी सांगितलं कि तुम्ही वाट चुकलायत , डाव्या बाजूने नका जाऊ उजव्या बाजूने जा तेव्हा तुम्ही मुख्य पठारावर पोहचाल. किल्याकडे जाताना नेहमी उजव्या बाजूने चालत जावे. सुरवातीला झाडा झुडपात जाणारी सोपी वाट आता अवघड होतचाली होती .एक ट्रेकर ग्रुप वाट चुकून एका उंच कातळ मध्यावर अडकले होते त्याना आवाज देऊन मुख्य  वाटेस  मागे येण्यास सांगितले आणि आमचा प्रवास सुरु केला .मे महिना असल्यामुळे वाटे मध्ये करवंद आणि आंबे हा गावरान मेवा मानस्तोक्त खात खात प्रवास चालू होता .
कातळामध्ये कोरलेल्या सुंदर पायऱ्या 
गावापासून बराच लांबचा टप्पा पार केला आणि सहयाद्री ची अजस्त्र रांग दिसू लागली ..दीड  तासा मध्ये आम्ही मुख्य पठारावर पोहचलो .पठारावरून आपणाला आपल्या उजव्या बाजूस फणी हा एक नागाच्या फण्यासारखी सुळका असलेला डोंगर दिसतो आणि त्याचा बाजूस भास्करगड दिसतो  .बराच वेळ आराम आणि फोटो काडून  झाल्यावर मुख्य दगडी पायऱ्याकडे जाणारी वाट पकडली .  हि वाट अवघड आहे ,उन्हा मुळे माती निसरडी झालेली त्यामुळे  पाय अगदी जपूनच टाकावा लागत होता.
सरळ पायऱ्या 
थोड्याच वेळात आम्ही हरिहरच खास वैशिष्ट्य असलेल्या कातळपायऱ्याच्या जवळ पोहचलो.कितीवेळ तरी एकटक त्या पायऱ्यांकडे  फक्त बघतच रहावं असं सौन्दर्य या पायऱ्यांच आहे. बराच वेळ इथे पायऱ्यांचा  पायथ्याशी घालवल्यावर एक एक करून आम्ही चढाईला सुरवात केली. एका वेळी एकच जण वरती जाईल एवडीचं वाट आहे .प्रत्येक पायरी मध्ये केलेल्या खोबणी मुळे चढाई सुखरूप होते . सावधगिरीने चढाई केली कि आपणाला दोन बुरुजांमध्ये असलेला महादरवाजा लागतो .भगवा शेंदूर फासलेला महादरवाजा पार झाला कि गणेशाची सुंदर कोरीव मूर्ती कातळात कोरलेला आहे. इथून पुढे जाणारा मार्ग म्हणजे अचंबित करून सोडणार आहे ,दगडी कातळामध्ये कोरलेला अर्ध वर्तुळकाळ भुयारी मार्ग म्हणजे आश्चर्यच ! इथून आपणाला भास्करगड , फणी डोंगर दिसतो.  पुढे चालत गेलो कि परत आपणाला ६० ते ७० वरती जाणाऱ्या एकेरी पायऱ्या लागतात .हरिहर गड म्हणजे वास्तू स्थापत्याचा अप्रतिम नमुना एक आश्चर्य संपलं कि पुढे एक आश्चर्य पुढे आहेच ... आम्ही सर्वानी सावधगिरीने कातळातमधील  हा मार्ग पार करून .दुसऱ्या भग्न दरवाजातून आम्ही  मुख्य पठारावर येऊन पोहचलो. 
ब्रह्मगिरी पर्वत रांग 
किल्यावर जास्त काही अवशेष शिल्लक नाही आहेत . आपणाला पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो  .काठावरच हनुमानाची शेंदूर फसलेली सुंदर मूर्ती एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहे .  त्याचाच बाजूला महादेवाची पिंड आणि नंदी च दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो . वाटेत आम्हला वाड्याचे काही अवशेष दिसले ते पाहत आम्ही पुढे गेलो . तसच पूर्वेकडे चालत गेलो कि आपणाला लागते सुस्थितीत असलेली एक खोली लागते.  या खोलीचा वापर पूर्वी दारुगोळा साठा ठेवण्यासाठी किंवा धान्यसाठा ठेवण्यासाठी होत असावा . गडावर राहायचं म्हंटल तर या इमारतीमध्य १० ते १५ जणांची राहण्यासाठी सोय होऊ  शकते . ऊन बरंच वाढलं होत खोलीच्या सावली मध्य बराच वेळ बसून गप्पा मारल्यानंतर आम्ही पुढे किल्यावरच्या सर्वात उंच ठिकाणी निघालो . गडाच्या या टेकडीवर चढताना मात्र रॉक पॅचिंगच थ्रिल अनुभवायला आपणाला मिळालं . वरती चढताना मात्र सर्वांचीच दमछाक झाली. टेकडीवरचा उंच भगवा फडकताना पहिला कि मराठ्यांचा इतिहासाची आठवण होते आणि अंगात वेगळाच उत्साह संचारतो .सर्वजण वरती चढले  आणि सर्वानी महाराजांच्या नावाचा गजर  करत एकच जल्लोष केला. आमचा रोजचा विडिओ सेल्फी घेऊन झाला .
मोकळ्या अंगणात केलेलं जेवण 
वरून आपणाला उत्तरेला दिसते  ब्रह्म गिरी पर्वत रांग , दक्षिणेकडे वैतरणा नदीचं खोर फार मनमोहक दिसत , शेजारी भास्करगड आणि फणी डोंगर दिसतो. आम्ही  चढाईला फारच उशीर केल्यामुळे खूप जास्त वेळ झाला होता मग , उतरताना पटापट उतरायचं ठरलं. उतरताना सुद्धा ८०डिग्री पायऱ्यांमुळे  हरिहरचा ट्रेकचा  थ्रिल अनुभवायला मिळतो . उतरताना मात्र आम्ही रस्ता चुकलो आणि थोड्याच वेळात परत  मुख्य वाटेवर आलो आणि १ ते १. ३० तासामध्ये गावात पोहचलो . गावा मध्य जेवण तयारच होत ,मग जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो. कातळातील पायऱ्यामुळे उतरतानाही ट्रेकच  भन्नाट थ्रील देणारा हरिहरचा  ट्रेक चिरस्मरणीय ठरतो .
महादरवाजाच्या इथे काढलेला सेल्फी 



किल्याचा इतिहास - हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिकला. 


किल्ला हरिहर - हर्षगड

तालुका त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक

उंची - ११२० मीटर

चढाई श्रेणी - मध्यम

योग्य कालावधी - सपेंबर ते फेब्रुवारी ( भर पावसात हा ट्रेक करू नये )

हरिहर गड ला कसे जाल - मध्य रेल्वेने कसारा या स्टेशन पर्यंत पोहचावे . तिथून आपणाला बस किंवा खाजगी वाहनाने निर्गूणपाडा या गाव मध्य जाऊ शकतो

खाजगी वाहन आधीच बुक करण्यासाठी
प्रकाश - ९८२३९८६२३३   ( private  गाडी साठी यांना संपर्क करा )

आमची भटकंती बघण्यासाठी आमच्या youtube  चॅनेल ला subscribe करा .




Tuesday, January 30, 2018

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई! ( Kalsubai )

"शिवाजी महाराज टर्मिनस वरुन सुठनारी कसारा लोकल थोड्याच वेळात प्लेटफॉर्म क्रमांक एकवर येत आहे " ही अनाउंसमेंट एकूण धावतच प्लेटफार्म क्रमांक एक गाठला आणि आमच्या कळसुबाईच्या प्रवासाला सुरवात झाली . तर आज आम्ही चालोय इगतपुरी तालुक्यातील बारी गावत असलेल्या महाराष्ट्राचा एवरेस्ट   म्हणजे कळसुबाई शिखरावर... कळसुबाई सर करणे हे प्रत्येक भटक्यांचं एक आकर्षण असत .  खूप दिवस जाण्याचा मानस होता पण काहींना काही कारणास्तव जमत नव्हते या वेळी मात्र प्रवीण,तन्मय आणि लहू आम्ही तिघांनी मिळून फिक्स केलं .ऑफिस मधून तिघे नवीन मित्र बिलाल , सिराज आणि इंदर आमच्या सोबत यायला उत्सुक्त होते ,आणि सोबत अनिल आणि विजय सुद्धा येणार होते सर्व मिळून आम्ही ९ जण होतो. 

कल्याणला प्रवीण आणि तन्मय भेटलो ,इंदर, बिलाल आणि सिराज या तिघांनी घाटकोपर वरून ११. ५० ची कसारा लोकल पकडली आम्ही ६ जणांनी तीच लोकल कल्याण वरून पकडली आणि प्रवासाला सुरवात झाली , सर्वांची ओळख करून दिली आणि प्रवास सुरु झाला . यावेळी प्रवीण ने पूर्णपणे प्रवासाची परफेक्ट प्लॅनिंग केली होती ..कसारा पासून  पुढे बारी गावापर्यंत जाण्यासाठी आधीच गाडी बुक केली होती ,गावामध्ये नाश्ता आणि जेवणाची सोय सुद्धा केलेली होती ... जवळजवळ २ वाजता कसऱ्यला  पोचलो स्टेशन चा बाहेर ३०ते ४० वय असलेले ड्राइवर दादा आमची वाट बघत होते .

आमचा बारी गावाच्या दिवशीने  प्रवास सुरु झाला ,ड्राइवर दादांचा सोबतच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या . मध्ये मग चहा साठी एका टपरी वर गाडी थांबवली आणि फक्कड चहाचा ब्रेक घेऊन थेट बारी गाव गाठले ,गावामध्ये जेवणाची नाश्त्याची सोया सुद्धा  गावातील एका  तरुण गोरक्ष भिडे यांच्याकडे आधीच करून ठेवली होती, ड्राइव्हर काकांसोबत आम्ही त्याचा घरी पोहचलो..रात्रीचे जवळजवळ ३ वाजलेले ... दरवाजा ठोकवल्यावर त्यांनी दरवाजा उघडून त्याने हसून स्वागत केले ...

जवळच असलेल्या त्याचा दुसऱ्या घराकडे आम्हाला तो घेऊन गेला.कळसुबाई ला येणाऱ्यांसाठी राहण्याची सोया म्हणून त्यांचे हे घर होत . ऐसपैस ३ रूम असलेला घर होत ,त्याने दरवाजा उघडून आम्हाला फ्रेश होयला सांगितलं  स्वतः आमच्या नाश्त्याची तयारी करायला गेला ...फ्रेश होऊन झाल्यावर गोरक्ष नाश्ता घेऊन आला , गरमागरम कांदे पोहे आणि चहा गप्पा मारत खाण्याची मज्जा काही औरच ! गोरक्ष आणि आमच्या  त्याचा इथे राहायला येणाऱ्या ट्रेकर्सच्या अनुभवाच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या!

बोलता बोलता सकाळचे ५ वाजले  होते गोरक्ष कडे जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही बॅग घेऊन आम्ही कळसुबाई कडे कूच केली ,गोरक्ष मुख्य वाटे पर्यंत आमच्या सोबत पुढील वाट दाखवण्यासाठी आला होता ,पुढे जाणारी मुख्य पायवाट आणि कसे जायचे सांगून तो परत गेला . पण त्याचा सोबत आलेली गावातली  दोन भटकी " बिनपगारी गाईड कुत्री" आम्हाला जॉईन झाली , अनोळख्या रस्त्या वर त्यांची खूपच मदत होणार होती ...
गोरक्ष आणि आम्ही 
दिसले ती पायवाट हातातल्या बॅटरीच्या उजेडात तुडवत होतो ... बिलाल ,सिराज आणि इंदर तिघांची पहिलीच ट्रेक असल्याने त्यांची दमछाक झाली होती ,आता जरा चड  लागला होता मग समोर ३-४ वाटा  फुटल्या होत्या डावीकडे जाणारच तेवढ्यात बाजूलाच असलेल्या झोपडीतून "कुठं जायचं? उजवीकडून सरळ जा  ..नायतर चुकाल ...पुढं कळसुबाई च मंदिर लागल  ... " असा आवाज आला धन्यवाद बोलून उजवीकडे वळलो ..
गावातील कळसुबाई मंदिर 
इथून भंडारदरा अर्धा किलोमीटर असल्यामुळे इथे  थंडी बरीच असते  , थोड्या पुढे गेल्यावर कळसूबाईचे मंदिर लागलं , ज्या देवीच्या भक्तांना वर पर्यंत जाणे शक्य नसते त्याचा साठी देवीचे मंदिर खाली बांधलेलं आहे ,भगवा शेंदूर , नत आणि गळ्यात दागिने घालून सजवलेल्या देवीच्या नतमस्तक होऊन आम्ही फुडील प्रवासास सुरवात केली , मंदिराच्या मागील वाट थेट कळसुबाई शिखरावर जाते ,
मंदिरापासून केलेली सुरवात


वाट जास्त अवघड नव्हती ,आजचा सूर्योदय ७. १२ ला होणार होता ,महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावरून सूर्योदय पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच होती ...मग सर्वांचीच पाऊले झपाझप न थांबता पडत होती , आम्ही वाट चुकलो तरी सोबतची कुत्री आम्हला मुख्य  वाटेला घेऊन जात, सह्यन्द्री मध्ये भटकताना सोबत असणारी हे सोबती खरच कसली हि अपेक्षा न ठेवता खूप मदत करतात ...
डोंगराच्या पाठीमागून झालेला सूर्योदय 
आठवणीतला सूर्योदय 
सूर्यनारायणाच्या दर्शन घेण्याची वेळ झाली होती ,पूर्व कडील संपूर्ण सह्यन्द्रीची रांग लाल सोनेरी रंगात न्हाऊन निघाली होती ... अप्रतिम नजारा  होता ! थोड्याच वेळात आम्ही पहिल्या शिडी पर्यंत पोहचलो ... कळसुबाई वर पोहचेपर्यंत आपणाला ४ लोखंडी शिडया लागतात ,त्यातील पहिली शिडी लागली प्रत्येकजण शिडी काळजीपूर्वक मन शांत ठेवून सर्वचजण चढले आणि सूर्यनारायणाचे दर्शन घेण्यास सज्ज झाले ... थोड्याच वेळात गोलाकार लाल रंगातला सूर्य सह्यन्द्री मधून डोके वर करू  लागला , हा अनुभव शब्दात सांगणं केवळ अशख्यच ,त्यासाठी तिथे उभे राहूनच ते स्वर्गसुख अनुभवावं लागत ..  सूर्योदया सोबत फोटो घेण्याचा मोह कोणीही आवरू शकत नव्हता ..    बराच वेळ आपण किती चढाई करून वरती आलो ते बघून झाल्यावर पुढील प्रवास चालू केला
वर चढताना लागणाऱ्या लोखंडी शिड्या 
सह्यन्द्रीची डोंगररांग 

दुसरी आणि तिसरी शिडी सुद्धा पार  झाली ,शिडीमुळे शिखराची चढाई बरीच सोपी होते...या शिड्या २० वर्षांपूर्वी लावण्यात आल्या आहेत . शिडी चढताना अगदी सावधगिरी बाळगून चढत होते ... चढाई करताना मध्यच थांबून विश्राम घेऊन परत पायपिट चालू  करत होतो  ...जवळपास १ ते २ तासाच्या चढाईनंतर आम्ही एका पठारावर येऊन पोहचलो आणि सर्वानीच दमून बॅगचें  ओजी जमीनीवर टाकत खांद्यांचा भार कमी केला ... इथून आपणाला सह्यन्द्रीची अदभूत रांग दिसते आणि त्यावर फिरणारे पवनचक्की च्या रांगेचं दृश्य अप्रतिम दिसत होत. .. बराच वेळ अराम करून , आणलेल्या केळी ,सफरचंद खाऊन पेटपूजा झाली, सोबतच्या कुत्र्यांना बिस्केट भरवून पुढील वाटचालीला आम्ही सुरवात केली .
एक शिखर पार करून आल्यावरती दिसणार शेवटचा कळसुबाई माथा 
 कळसुबाई शिखराची गंमत म्हणजे आपण कितीहि वरती आलो तरी मुख्य शिखराचे दर्शन आपणाला होत नाही .शेवटच्या  माथ्यावर पोहचल्यावर मुख्य शिखराचे दर्शन होते ...दहा ते पंधरा मिनिट चाल्यावरती एक थंड पाणी असलेली विहीर लागते ,सोबतच्या कुत्र्यांनी  पाणी पिऊन तहान भागवली ..
शेवठची शिडी 
 कळसुबाई चा मंदिर समोर दिसूनही आम्हाला अर्धा तासाच्या वरती वेळ चौथ्या शिडी पर्यंत पोचण्यास लागला , चौथी शिडी म्हणजे ८० डिग्री असलेली शिडी ,खूपच सावधिगिरीने पार करावी लागत होती ,ती शिडी पार केली आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला .. आजूबाजूचे दृश्य थक्क करून टाकणारे होते ... पूर्वेकडून विश्रामगड,बितनगड आणि सह्यन्द्रीतलं सर्वात कठीण ट्रेक अलंग - मलंग - कुलंग दिसत होते , उत्तरेकडे औढा, पट्टा ,हरिहरगड , त्रीगलवाडी ,कावनई हे गड आहेत .... दक्षिणेकडे  हरिश्चन्द्रगड , रतनगड , खुट्टा सुळका आणि आजूबाजूचा डोंगर आहे , शिखरावरून भंडारदर्याला विस्त्रीन जलाशयाचे दर्शन होते ... सर्व काही अप्रतिम होते ...!
अलंग मदन कुलंग किल्ला 
भंडारदऱ्याचा  अप्रतिम नजारा 
शिखराच्या मध्यभागी कळसुबाईचे देऊळ आहे भगवा रंग आणि गोल घुमट असलेलं मंदिरआपलं  लक्ष्य वेधून घेत, मंदिराशेजारी त्रिशुंलं आणि काही घंटा बांधलेल्या आहेत ..मंदिराच्या आत बसून देवीचं दर्शन घेतलं एका वेळेस दोन जण बसतील एव्हडीच जागा आत आहे ... मंदिराच्या आतमध्ये खूपच गारवा आहे ..या कळसुबाई देवी विषयी एक दांत कथा प्रचलित आहे प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती राहाळात राहत होती. कामाच्या निमित्ताने ती इंदुरे गावात आली. इंदुरे गावात ती पाटलाच्या घरी काम करू लागली. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती, की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा, पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला केरकचरा काढण्यास व भांडी घासण्यास लावली. त्यामुळे कळसू चिडून डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच  हा कळसुबाईचा डोंगर होय. 
सोबती 
दुपारचे दीड वाजायला आले होते .. बराच वेळ आजूबाजूचा परिसर फिरून , फोटो काडून झाल्यावर थोडी पेटपूजा केली आणि परतीची तयारी झाली ,तो पर्यंत बघतो तर काय एक  ५० वर्षाचे आजोबा हात मध्य नारळाचं पोत आणि डोकयावर  पाण्याचा हंडा घेऊन शिडी चडून वरती येत होते .. आम्ही त्यांना बघून थक्कच  होतो ... 
काका येणाऱ्या देवीच्या भक्तांसाठी नारळ आणि लिंबू पाणी विकण्यासाठी आले होते ... 
काका किती वेळ लागला वरती यायला ?
"दोन तासा मंदी आलू वरती "रोज येता ?..." हो रोजच येतु  "... मग काकांकडून नारळ घेऊन देवीला अर्पण करून काकांचा राम राम घेऊन .. गावाचा दिशेनं उतरण्यास सुरवात केली ..
कळसुबाई देवीच मंदिर 
पाऊलांची गती फारच मंदावली होती ... सकाळची ५ तासांच्या चढाईने पाय अगदी मोडकळीस आले होते ... दिघेंजण नवीन असून तिघांनीही न थकता शिखर सर केला होता ,चढताना ज्या शिड्या सहज चढलो होतो त्या उतरताना मात्र थोड्या अवघडच वाटत होत्या.

आम्ही उतरतांना बरीच मंडळी कळसुबाई डोंगर चढत होते, सर्वच जण आता थकले होते मग मध्यच एक काका लिंबू पाणी विकत होते मग, लिंबू पाणी पिऊन सर्वचजण फ्रेश झाले . आणि पुढील प्रवास चालू झाला . शेवटच्या टप्प्यात आम्ही पोचलो होतो
चढाई नंतर काढलेला ग्रुप फोटो 
गावातली कौलारू घर दिसू लागली ,आम्हाला ३ तास उतरताना लागले ... शेवढी एकदाचे पोहचलो ... फ्रेश होऊन सर्वजण जेवायला बसले .गोरक्षने जेवणाची तयारी केली मटण आणि चपात्या ,बटाटयाची भाजी ,वाट्यान्ची उसळ ,आमटी,कोशिंबीर ,पापड  ... जेवणाचा फक्कड बेत गोरक्षने केला होता . पोटभर जेवण झाले ,तेव्हड्यात ड्राइव्हर दादा आले गोरक्ष चा धन्यवाद मानून त्याचा निरोप घेतला. सह्यन्द्री प्रेमींची तो मनापासून कसली हि अपेक्षा न ठेवता कित्यक वर्ष सेवा करत आहे .

गाडी मध्य बसून प्रवास चालू झाला बसताच काही जण झोपी गेले ... १६४६ मीटर उंच महाराष्ट्रातील उंच शिखर सर केल्याचा आनंद आणि समाधान सर्वांचाच चेहऱयावर दिसत होते ... मध्यावरून अनुभवलेलं सकाळचा सूर्योदय , शेवटच्या माथ्यवरून पाहिलेलं निळभोर आकाश आणि चारी बाजूने पसरलेली किल्यांची रांग ... सर्व काही सुंदर अनुभव मनाच्या एका कप्यात साठवत आमचा प्रवास मुंबईच्या दिशेने सुरु झाला .... !

  

कळसूबाई शिखर - समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 5400 फूट म्हणजे 1646 मीटर


जाण्यासाठी मार्ग : सेंट्रल लाईन लोकल ने कसारा रेल्वे स्टेशन ला उतरून  तुम्ही खाजगी गाडीने बारी गावात जाऊ शकता , 
किंवा इगतपुरी ला जाणाऱ्या एक्सप्रेस पकडून इगतपुरी स्टेशन ला उतरून पुढे बारी गावात जाण्यासाठी महाराष्ट महामंडळाच्या बस सेवा उपलब्ध आहे . 

कळसुबाई ला जायचं असल्यास कसारा वरून गाडी बुक करू शकता.  
९२२६५५११६
जेवण आणि नाश्ता करण्यासाठी 
गोरक्ष खडे - ९५२७६८६१६६


धन्यवाद !
अंकुश सावंत 
+९१ ९७६८१५३११४


Saturday, January 13, 2018

लेण्यांचा जगात -कोंडाणा लेणी / Kondane Caves

     महाराष्ट्र !!! सह्यन्द्रीच्या अंगावर असणाऱ्या अजस्त्र किल्ले आणि लेणी 'शिल्पांनी नटलेला ...रायगड जिल्यातील कर्जत तालुका हा सह्यन्द्रीच्या डोंगररांगेच्या निसर्गाने नटलेला परिसर ,मुंबईपासून अगदीच जवळ असल्याने येथे भटक्यांची नेहमीच वर्दळ असते . राजमाची,सोंडाई,कोथळीगड यासारख्या किल्यांनी नटलेल्या कर्जत तालुक्यात एक अतिप्राचीन लेणी वसलेली आहेत.  कर्जत मधल्या कोंडिवडे गावात या बोध्दकालीन अतिप्राचीन लेणी कोरलेल्या आहेत . राजमाची ट्रेकला जाणाऱ्या वाटेवरच आपणाला या लेणी लागतात .

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणारी सकाळीची कर्जत ट्रेन पकडून आम्ही जाणार होतो ,प्रवीण आणि तन्मय दोघांना हि सुट्टी नसल्यामुळे ऑफिस वरूनच येणार होते दोघेही आम्हला कल्याणला भेटले  . ठरल्याप्रमाणे पहिल्या डब्यामध्ये मी आणि लहू चढलो ,ट्रेन मध्ये खूपच गर्दी होती ...आमचा प्रवास चालू झाला .पुढे कर्जतला उतरून आम्ही गरमागरम पोहे आणि वडापाव खाऊन पुढील प्रवास चालू केला .

इथून पुढे श्रीराम ब्रिज पर्यंत आम्ही रिक्षा केली प्रत्येकी १० रुपये रिक्षावाले घेतात ,तिथून पुढे आपणाला कोंडीवडे गावात जायला सहा सीटर भेटतात . प्रत्येकी ३० रुपये कोंदिवडे गावात जाण्यासाठी घेतात . श्रीराम ब्रिज ते कोंडिवडे  गावापर्यंतचा प्रवास फारच सुंदर होता. संपूर्ण परिसर धुक्याची शाल पांघरून घेतलेली आणि अंगाला लागणारीधंडी  यामुळे प्रवास अगदी सुखकारक झाला . नागमोडी गावातून जाणारी वाट एकाबाजूस वाहणारी उल्हास नदी आणि एकाबाजूस रायगड जिल्यातील सह्यन्द्रीची रांग . १३ किलोमीटरचा प्रवास करायला साधारण आम्हला ४५ मिनटं लागली . कोंडीवडे गावात आम्ही येऊन पोचलो प्रत्येक गावात त्या गावाच एक ग्रामदैवत असत या गावातल्या ग्रामदेवतांच्या मंदिराच दर्शन घेतलं ,मंदिराच्या घुमटाचा आकर्षक पद्धतींनी बांधकाम केलेलं आहे ,दरवाजावर दोनी बाजूस आकर्षक द्वारपाल कोरलेले आहेत आत सुंदर ग्रामदेवतांची पाषाणात कोरलेली मूर्ती आहेत  . दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरु केला.
पिपळाच्या पानाच्या आकाराची कमानी

 कोंडिवडे गावाच्या आतून परत आपणाला एक ते दोन किलोमीटर चालत मुख्य ट्रेकचा सुरवातीच्या पॉईंट वर पोहचावे लागते आपण पाहिजे तर पुढे जाण्यासाठी रिक्षा सुद्धा करू शकतो पण आम्ही चालतच जाण ठरवलं .उल्हास नदीच्या बाजूने जाणारी डांबरी रस्ता पकडून पायपीट सुरु केली ,लांबून दिसणाऱ्या डोंगररांगेत कुठल्या डोंगरात लेणी कोरल्या असतील याचा अदाज लावायला चालू झाला  .आम्ही सकाळीच गावात पोचल्यामुळे नदीच्या पात्रात गावातील बऱ्याच बायका कपडे धुण्यासाठी आल्या होत्या त्यान्चाकडे विचारपूस करून आम्ही कोंडाणे लेण्याचा मुख्य वाटेवर येऊन पोहचलो आता येथून चढाईस सुरवात करायची होती जवळपास १ते १. ३० तसाच हे अंतर आहे . अर्धा एक तासानंतर आपणाला कोंडाणे धबधबा लागतो पाऊसमध्य येथे पर्यटकांची बरीच गर्दी असते . थोडावेळ विश्रांती घेऊन परत निघालो . पुढे जंगल घनदाट होत जात ,जंगलातून फिरताना सह्यन्द्री मध्ये फिरणारे प्राणी आपणाला बराच वेळेस दिसतात ,या वेळी काळ्या तोंडच वानर पुढे बसल्याच आम्हला प्रवीण ने सांगत मग सावधहोऊन पुढे गेलो तेव्हा दगडावर बसलेल्या वानर  बघयला भेटला . जवळजवळ १ते १. ३० तासाच्या पायपिटी नंतर आम्ही कोंडाणा लेणी पर्यंत पोहचलो .लेणी बाहेरून पाहिल्यावरच आपल्या तोंडातून अप्रतिम हे शब्द अपूणच  निघतात. थोडा वेळ विश्रम घेऊन आम्ही लेणी बघण्यास सुरवात केली .
पहिल्या गुहेंत असलेलं स्तूप 

 कोंडाणा लेणी मध्ये आपणाला चैत्य ,विहार आणि दोन गुहा आहेत ,विहाराच्या छतावर चित्रे काढली आहेत पण ती आता थोडीशी मिटलेली आहेत . पहिली गुंफा म्हणजे चैत्य किंवा चैत्यगृह हे बॉंद्ध लोकांचे प्रार्थनास्थळ असते ,येथे बोद्ध लोकांच्या समाध्या असतात . .चैत्य ग्रहाचा मध्यभागी आपणाला भग्नावस्थेतला असलेलं मोठा अंडाकृती आकाराचं शिल्प दिसत याला स्तुप्त असं बोलतात . हे स्तुप्त सध्या भग्नावस्थेत आहे .बाजूला अषट्कोनी आकाराचे १३ खांब आहेत .   चैत्य गृह अंदाजे ९ मीटर उंच आहे ,सुरवातीला लाकडाच्या पानाच्या आकाराची कमानी आहे . अशाच  प्रकारची लाकडी कमानी आपणाला कार्ले भाजे लेण्यांमध्ये आहे . आणि चैत्य गुहेंच्या सुरवातीला पिपळ्याच्या पानाच्या आकारामध्ये नक्षी काम केलं आहे ,हे नक्षी काम बघताना आपणाला नक्कीच कोरणाराचे आश्चर्य वाटत . चेत्यचा भिंतीवर आपणाला ,वेदिकापट्टी ,नक्षीदार जाळी काम आणि नृत्य करणारे कलाकार कोरलेले दिसतात या कलाकारांच्या अंगावरचे अलंकार आणि त्याचा हातात आभूषणे आणि धनुष्य बाणाप्रमाणे शस्त्र आहेत .
नक्षीकाम 
याच्या पुढची गुहा म्हणजे विहार,आपणाला ७ते ८ दगडी पायऱ्या चालून वरती जावं लागत . या विहाराची उंची ५फूट ८इंच आणि १८ फूट लांबीची आहेत . विहाराच्या भिंतींमध्ये विश्राम घेण्यासाठी १४ खोल्या कोरलेल्या आहेत . प्रत्येक दरवाजा नक्षीदार कोरलेला आत एकावेळी एकाच माणूस राहील एवडीच जागा आणि विश्राम घेण्यासाठी एक चोंकोनी दगडाचा पलंग केलेला आहे .
विरहाराच्या भिंतीवर कोरलेलं स्तूप 
विहार 
विरहाच्या डाव्या भिंतीवर आपणाला एक स्तूप कोरलेलं आहे ते सुस्थित आहे. विरहाच्या तीनही भिंतीवर सुंदर नक्षी काम केलेलं आहे . छपरावर आपणाला चोकोनी आकाराचं नक्षी काम दिसत . विरहाच्या भिंती काळ्या रंगाच्या झाल्या आहेत . समोरची भिंत विध्वस्थ झाली आहे ,इथून आपणाला समोरच सुंदर दृश्य बघावयास मिळते .
भितिंवरच सुंदर रेखीव नक्षीकाम 
त्यालाच लागून आपणाला तीसरी आणि चौथी  गुहा लागते , या गुहा रिकाम्या आहेत ,यामध्ये नक्षी काम केलेलं नाही आहे .चौथ्या  गुहे मध्ये पाणी साठलेलं दिसत . पाऊसात येथून   सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारा धबधबा वाहतो . लेण्या पाहून झल्यावर आम्ही समोरच्या  धबधब्यचा पात्रात जेवण्यासाठी बसलो .बऱ्याच वेळ गप्पा मारत जेवण करून झाल्यावर आम्ही परतीचा प्रवास चालू केला .परतीच्या प्रवासात आतापर्यंतच्या भटकंती मध्ये पहिल्यांचवेळी बिनविषारी साप बघतला . आम्हला बघून तो त्याचा मार्गानी परत निघून गेला . उन्हामुळे थकवा जाणवत होता पाऊले पटापट टाकत आम्ही परतीचा प्रवास करत होतो .



जाण्याचा मार्ग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत ट्रेन ने प्रवास पुढे , श्रीराम  ब्रिज ते कोंदिवडेगाव रिक्षाने जावे

जेवणाची सोय- गावामध्ये जेवणाची सोय होते ,पाणी स्वतः घेऊन जावे .

बघण्यासारखे - कोंडाणे धबधबा , सह्यन्द्रीचे सोंदर्य , प्राचीन बौद्धिक लेणी , लेण्यांचा अप्रतिम रेखीव कोरीव काम

व्हिडीओ स्वरूपात बघण्यासाठी आपल्या चॅनेल ला नक्की भेट द्या ,आणि चॅनेल subscribe  करायला विसरू नका

धन्यवाद . !
अंकुश सावंत .